भारताचा स्वदेशी 4G नेटवर्कचा 5G प्रवास — उद्योगक्षेत्रासाठी नवी क्रांती
दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केलेल्या घोषणेनुसार BSNL चे स्वदेशी विकसित 4G नेटवर्क पुढील 6-8 महिन्यांत 5G मध्ये अपग्रेड केले जाणार आहे. ही घोषणा केवळ दूरसंचार क्षेत्रापुरती मर्यादित नसून, ती भारतीय उद्योग, उत्पादन, स्टार्टअप्स आणि डिजिटल सेवा क्षेत्रांच्या भविष्यातील व्यावसायिक संधींशी थेट संबंधित आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरात 92,564- 4G टॉवर्सचे उद्घाटन करण्यात आले, ज्यामुळे भारत अधिकृतपणे जागतिक 4G तंत्रज्ञान क्लबमध्ये सामील झाला आहे. विशेष म्हणजे, ही संपूर्ण नेटवर्क रचना भारतीय तंत्रज्ञान मानकांवर आधारित आहे, ज्याचा विकास पूर्णपणे देशातील कंपन्या आणि संशोधन संस्थांच्या सहकार्याने करण्यात आला आहे.या नेटवर्कचे 5G मध्ये रूपांतर हे भारताच्या तांत्रिक स्वावलंबनाची दिशा दाखवणारे पाऊल आहे. BSNL चा या प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण आणि दुर्गम भागापर्यंत उच्चगती इंटरनेट सेवा पोहोचविण्याचा उद्देश आहे.
मंत्री सिंधिया यांनी सांगितले की भारताचा GDP वाढीचा दर 7.8% आहे, आणि देश सध्या जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाइल फोन उत्पादक म्हणून ओळखला जातो. या क्षेत्रात निर्माण झालेली आर्थिक आणि तांत्रिक वाढ आगामी वर्षांत डिजिटल अर्थव्यवस्थेला अधिक मजबुती देईल.त्यांच्या म्हणण्यानुसार, “भारताच्या दूरसंचार क्षेत्रातील ही मोठी झेप केवळ नेटवर्कच्या दृष्टीनेच नव्हे, तर रोजगार, उत्पादन आणि संशोधन क्षेत्रातील स्वदेशी क्षमतेचा द्योतक आहे.”
BSNL ची स्वदेशी 5G झेप ही केवळ डिजिटल युगातील पायाभूत सुविधा सुधारणा नाही, तर ती भारतीय उद्योगक्षेत्राला जागतिक स्पर्धेत उतरविण्याची तयारी आहे. उत्पादन, सेवा, स्टार्टअप्स आणि ग्रामीण अर्थव्यवस्था या सर्व क्षेत्रांना याचा दूरगामी फायदा होणार असून, भारताच्या “अत्याधुनिक पण स्वदेशी” डिजिटल सामर्थ्याचे हे द्योतक ठरेल.

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home